ती परत येणारच नाही - Wordflyz

ती परत येणारच नाही

“ती परत येणारच नाहीये..तू व्यर्थ चकरा मारू नकोस इथे…”

दीपा विजयला समजावत होती..

“एक…फक्त एक संधी द्यायला सांग…मी पाया पडतो तिच्या…”

बिल्डिंग मधल्या जिन्यातच दीपा आणि विजय चं संभाषण एक आजोबा ऐकतात…दीपा आणि रश्मी..दोघी मैत्रिणी बिल्डिंग मधल्या एका फ्लॅट मध्ये भाड्याने रहात होते. रश्मी च्या गळ्यात मंगळसूत्र असायचं..आजोबांनी हा रश्मी चा नवरा असावा हे ओळखलं…

आजोबा बोलायला लागले,

“काय चाललंय तुमचं…कोण हा…”

“माझ्या मैत्रिणीचा नवरा…तिला न्यायला येतोय…पण तिला जायचं नाहीये…”

“आजकालच्या मुलींना अजिबात किंमत नाही नवऱ्याची, संसारपाणी सोडून नोकरी करतात…आणि वर म्हणतात आम्ही स्वतंत्र आहोत…इतके आढेवेढे घेतात का कधी? हा तिचे पाय पडायच्या गोष्टी करतोय…कोणता नवरा बायकोचा असा पाय पडतो? तिला म्हणा गपगुमान जा नवऱ्यासोबत…”

“विजय तू जा…”

दीपा ने विजय ला तिथून पाठवून दिलं…

“आजोबा…कुठला नवरा बायकोच्या पाया पडतो असं म्हणालात ना? पण ती काहीही झालं तरी परत जाणार नाहीये.. हाच माणूस, जो आज इतक्या गयावया करतोय ना…याच माणसासाठी रश्मी रात्री अपरात्री त्याला शोधायला बाहेर पडायची… कुठल्या तरी कडेला दारू पिऊन हाच माणूस पडलेला असायचा…तिने त्याला माणसात आणायचा प्रयत्न केला…पण वाट्याला तिच्या मारहाण आली…संसार चालवायला एकेक पैसा ती एकटी कमवायची…आणि हा माणूस भांडून दारू साठी पैसे न्यायचा…जगाला दाखवायला अगदी मॉडर्न, श्रीमंत जोडपं म्हणून वावरायचा…पण चार भिंतीआड…एक जनावर म्हणून वागायचा…तिने त्याचे हातपाय जोडून, सर्व प्रयत्न करून त्याला बदलण्याचा प्रयत्न केला, पण सगळं व्यर्थ…पण तरीही तिने त्याला एकटं सोडलं नाही..तिने याला तेव्हा सोडलं जेव्हा त्याचा मारहाणीने तिच्या पोटातला जीव जग सोडून गेला…सांगा…जावं तिने परत? पुन्हा मारहाण सोसायला? पुन्हा त्याच्या अत्याचाराचा बळी व्हायला? केवळ मी ‘विवाहित’ नावाचं सन्मानपूर्वक बिरुद मिरवायला आणि समाजासाठी फक्त इतके सारे अत्याचार सहन करायचे? की जगावं मुक्तपणे स्वतःच्या नियमांनी, स्वतंत्र..एकाकीपणाच्या आयुष्यात… जिथे दुसऱ्याला आणि दुसऱ्याच्या राक्षसीपणाला स्थान नसतं… असतं ते केवळ एक अस्तित्व… ज्यावर अधिकार हा संपूर्ण स्वतःच्या अंतरातम्याचा असतो…”

आजोबा खजील झाले…आपल्या खोलीत गेले..माळ चढवलेल्या आपल्या बायकोच्या तसबिरीकडे बघून म्हणाले…

“शिक्षणाने स्त्रियांच्या अंगात स्वतंत्र बनण्याचं बळ भरलं…काश..तुही जरा धीर दाखवला असतास, स्वतंत्र राहण्याचं धाडस दाखवलं असतं तर…आज तूही या जगात असतीस…सुखाने..आपण वेगळे का असेना…पण जिवंत तर असतो…आपापल्या जगात…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!