मॅडम - Wordflyz

मॅडम

“मॅडम चं काय जातंय ओव्हरटाईम करा म्हणायला..इथे आम्हाला घरचे बोलणे खावे लागतात, मॅडम चं बरं आहे, घरी राणीसारखा थाट असेल, त्यांना चालत असेल सगळं…”

ऑफिस मधल्या महिला लंच टाइम मध्ये सगळा राग काढत होत्या. नाईक मॅडम च्या हाताखाली काम करणं म्हणजे चोवीस तास डोक्यावर टांगती तलवार. काम चोख होईपर्यंत मॅडम काही जागचं हलू देत नाही.

“त्या पण एक स्त्री आहे ना? मग इतर स्त्रियांची परिस्थिती त्यांना समजायला नको? त्यांचा घरात असतील सगळ्या कामाला बायका, आम्हाला घर सांभाळून ऑफिस ला यावं लागतं म्हणा”

महिला कर्मचाऱ्यांचा तक्रारीचा पाढा काही सम्पतच नव्हता.

नाईक मॅडम साधारण पस्तिशीतल्या, कमी वयातच त्यांनी आपल्या उत्तम कामाने उच्च पद मिळवलं..कामाच्या बाबतीत त्यांना हलगर्जीपणा चालत नसे.फारच शांत होत्या त्या, मोजकेच आणि कामापूरतं बोलत. सतत कसल्यातरी विचारात गढून असायच्या. सर्वांच्या आधी कामावर येत आणि सर्वांच्या शेवटी घरी जात.

एके दिवशी नाईक मॅडम ला यायला उशीर झाला, सर्व महिला कर्मचाऱ्यांना आश्चर्य वाटलं, इतक्यात बाहेर कसलातरी गोंधळ ऐकू आला..नंतर कळलं की मॅडम पार्किंग मध्ये गाडीवरून पडल्या आणि पायाला दुखापत झालीये.. ऑफिस मधल्या दोन तीन महिला कर्मचाऱ्यांनि त्यांना गाडीत बसवलं आणि त्यांचा घरी नेलं…मॅडम च्या घरी त्या पहिल्यांदाच जात होत्या…

एका मोठ्या बंगल्यापाशी गाडी थांबली. दारात एक सुंदर रांगोळी होती, अंगणही छान झाडलेलं आणि फुलपानांनी बहरलेलं दिसलं..त्यांनी मॅडम ला धरून दार वाजवलं तोच दारात भांडी आपटल्याचा आवाज आला.

“सांगितलं होतं आज नैवेद्याचं सगळं करून जा म्हणून, सगळं केलं आणि पोळ्या ठेवल्या तश्याच…मी आहेच मग राबायला..काय तर म्हणे आज मिटिंग आहे…असली बायको करण्यापेक्षा तुला बिनलग्नाचं ठेवलं असतं तर परवडलं असतं”

मॅडम च्या सासुबाईंची आत आदळआपट चालू होती..मॅडम ने ते ऐकलं, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं..आतून दरवाजा कोणीही उघडेना, मग त्यांनी पर्स मधली चावी एकीला काढायला सांगून दरवाजा उघडला.

आत मॅडम चा नवरा सोफ्यावर आडवा पडलेला..दारूचा भयाण वास येत होता…त्या आत गेल्यावर सासूबाईंनी पाहिलं. मॅडम ची अशी अवस्था असून काही विचारपुसही केली नाही आणि दात ओठ खात त्या आपल्या खोलीत निघून गेल्या.

मॅडम सोबत आलेल्या महिला घरातलं वातावरण पाहून घाबरल्या, मॅडम मात्र शांत होत्या. महिलांनी त्यांना पाणी दिलं, त्यांचा बेड वर नीट बसवून दिलं.
त्या महिलांना जाणीव झाली, आपल्या अडचणींपेक्षा मॅडम च्या अडचणी भयानक आहेत, आपण मॅडम ला खूप काही बोलून जायचो पण आज जी परिस्थिती पहिली त्याने त्या महिला अगदी सुन्न झालेल्या.

मॅडम कधीच कामाव्यातरिक्त बोलत नसत, पण आज त्या बोलू लागल्या..

“चकित झाला असाल ना माझ्या घरचं वातावरण बघून? गेली कित्येक वर्षे मी याच वातावरणात राहत आलीये, तुम्हाला मी समजून घेत नाही असा तुमचा गैरसमज असेल, पण तुम्हाला काम करण्यास सांगून मला एवढंच सांगायचं होतं की घरातल्या कटकटींना, अडचणींना कधीही शरण जाऊ नका..तुमच्या अपयशाला ह्या लोकांना कारणीभूत करू नका..तुमच्या विजयासाठी तुम्हाला कोणीही आधार देणार नाही, पाय खाली खेचायला मात्र सर्वजण तयार असतील..खंबीरपणे त्यांना सामोरं जा..तुमच्या यशाला तुम्हीच जबाबदार असाल..तुम्हा सर्वांना काय अडचणी आहेत हे मी जाणून होते, पण त्याचं भांडवल बनवून तुम्ही परिस्थिती ला शरण जाऊ नये म्हणून मी तुम्हाला कधीही मोकळीक दिली नाही. एक लक्षात घ्या, तुमचं आयुष्य तुम्हाला घडवायचं आहे…एकतर्फी तुम्हाला आयुष्याची लढाई जिंकायची आहे… तेव्हा घरातल्या क्षुल्लक कारणांना किंमत देऊ नका…”

मॅडम यशाच्या उंचीवर का पोहोचल्या यामागचं कारण, वरवर सुंदर दिसणाऱ्या आयुष्यामागच्या जखमा आणि लढलेली लढाई आज खऱ्या अर्थाने त्या महिलांना उमगली होती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!