मिस परफेक्ट (भाग 2) - Wordflyz

मिस परफेक्ट (भाग 2)

दुर्गा बाईंचा मुलगा वयात आलेला असतो, माधवी चेही कॉलेज सम्पलेले असते. माधवी च्या आई वडिलांना तिच्या लग्नाची घाई असते. आई माधवी ला म्हणते,

“पोरी लग्नासाठी आहेस का तयार?”

“कधीच..”

“आं? अगं लग्न म्हणजे साधीसुधी गोष्ट नाही…खूप गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतील..”

“सगळं सोपं असतं…. chill..”

आईला माधवी चा बिनधास्त स्वभाव माहीत होता, पण हा स्वभाव लग्नानंतर काही उपयोगात येणार नाही हे तिला माहीत होतं.

एका मध्यस्थाने दुर्गा बाईंना माधवी चं स्थळ सुचवलं. माधवी ला पाहायला ते सर्वजण आले. शुभरा ला माधवी ला पाहून आनंद झाला, हीच माझी वहिनी पाहिजे असा हट्ट तिने धरला. आईला तिने माधवी बद्दल बरंच चांगलं चांगलं सांगितलं त्यामुळे दुर्गा काकू निर्धास्त होत्या. आणि मुलगा तुषार हा कमालीचा हुशार. माणसं ओळखण्यात पटाईत. त्याला अशीच मवाळ मुलगी हवी होती.

कांदेपोहे चा कार्यक्रम ठरला. माधवी ला पाहायला सर्वजण आले.

“माधवी, दार उघड…झाली का तयारी? पाहुणे आलेत बाहेर…”

माधवी जांभई देत दार उघडते..

“हे काय?? तू अजून झोपली होतीस? नाईट ड्रेस वरच आहेस अजून? अरे देवा…कसं होईल आता..आवर पटकन साडी नेस..”

“पाहुणे आलेत? कुठेय बघू?”

असं म्हणत माधवी डायरेक्ट पाहुण्यांसमोर जाते. दुर्गा काकू तिला बघून चक्रावतात. शुभरा माधवी ला बघून तिला मिठी मारते…

“माझी वहिनी होशील ना?”

माधवी पेक्षा शुभरा जास्त एक्साईट झालेली असते.

“चालेल की..कोण आहे नवरदेव?”

तुषार तिच्याकडे बघतो..

“नाकी डोळी चांगले आहेत..उंच आहे…माझ्याकडे पाहून लाजतोय…ठिके, पसंत आहे मला…कधी करायचं लग्न?”

“अगं ए…त्यांचा होकार तर येऊ देत…” वडील म्हणतात..

“असं असतं काय? ठिके…तुम्ही विचार करा…मी तोवर हे पोहे संपवते…”

दुर्गा काकूंची पोह्यांची डिश उचलत माधवी एका खुर्चीवर जाऊन पोहे खायला सुरवात करते. .

तिच्या आई वडिलांना घाम फुटलेला असतो. अवघ्या 5 मिनीटात या पोरीने आपले गुण उधळले…

आई म्हणते,

“माफ करा…आमची मुलगी फार बिनधास्त आहे…कदाचित तुम्हाला ते आवडलं नसेल…तुमचा वेळ घेतल्याबद्दल माफी मागतो..”

आई वडील आधीच बोलून टाकतात.

“कोण म्हटलं आम्हाला मुलगी आवडली नाही? फक्त आता तुषार आणि माधवी चं बोलणं झालं की मग ठरवू…संसार त्यांना करायचा आहे…माधवी….झाले का पोहे खाऊन?”

“हो..आत्ताच झाले..तेवढं पाणी देता का?”

“घे की…आणि पाणी पिऊन झालं की तुषार आणि तू बाहेर जा बोलायला..” दुर्गा बाई पाण्याचा ग्लास तिच्या हातात देत म्हणतात…

“बाहेर कशाला? इथेच बोलतो की…हं. .तर तुषार नाव तुझं…काय काय आवडतं तुला? मी सोडून?”

तुषार ला हसू फुटतं..

“तू सोडून काहीच आवडत नाही…”

“मग होकार देऊन टाक लग्नाला..लग्न करून घेऊ…जास्त तानायची गरजच काय??”

“बरं… माझा होकार आहे..”

आई वडिलांना समजत नाही की इतकं सगळं होऊन यांनी होकार कसा दिला. दुर्गा बाईंना आई कोपऱ्यात घेऊन याबाबतीत विचारते तेव्हा त्या सांगतात..

“आजवर मुखवटे चढवलेल्या खूप मुली पाहिल्या.. अवाजवी प्रशंसा करत काहीही खोटेपणा मिरवणाऱ्या मुली पाहिल्या…पण माधवी खूप वेगळी दिसली…तिच्यात खरेपणा आहे. आणि आजकाल जगात खरेपणा कुठे दिसतो हो…”

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!